सातारा – दीपक उर्फ आप्पा मांढरे गोळीबार प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि शाहूपुरी पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून आणखी दोन संशयितांना अटक केली. गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार ऋषभ जाधव व त्याचा साथीदार चंद्रकुमार निगडे यांना शाहूपुरी पोलीस पथकाने पुणे येथून 24 डिसेंबर रोजी ताब्यात घेऊन अटक केली.
फिर्यादी दीपक मांढरे त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी दि. 9 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री साडेआठ वाजता गोलबाग येथे गेले असता वीस ते पंचवीस वयोगटातील तीनपैकी एका व्यक्तीने त्यांच्याकडील पिस्तुलातून मांढरे यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
गुन्ह्याच्या तपासात यापूर्वी गोळीबार करणाऱ्या एका संशयितास व दोन अल्पवयीन बालकांना 10 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. एका संशयिताकडून पुण्यातून पिस्टल हस्तगत केले होते. पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला होता. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार व स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून समांतर तपास सुरू असताना ऋषभ जाधव याच्याकडे एकूण तीन पिस्टल असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे सुयोग कदम यांच्याकडे एक पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्यावरून 24 नोव्हेंबर रोजी त्याला ताब्यात घेऊन ते पिस्टल हस्तगत करण्यात आले.
याशिवाय गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार ऋषभ जाधव व चंद्रकुमार निगडे यांना शाहूपुरी पोलिसांनी पुणे येथून अटक केली. या तपासामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विशेष तपास पथक यांच्या तपासाअंर्तगत एक पिस्टल चंद्रकुमार निगडे यांच्या मदतीने लपवून ठेवल्याची माहिती जाधव याने दिल्याने 26 डिसेंबर रोजी गुन्ह्यात वापरलेले पिस्टल जप्त करण्यात आले. पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक संजय पतंगे, शाहूपुरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, अमित पाटील, विजय कांबळे, अतिश घाडगे, संजय शिर्के, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, अमित माने, ओंकार यादव, स्वप्नील कुंभार, स्वप्निल पवार यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.