पुणे -कार्ला येथील एकवीरा देवी गडावर रोप-वे प्रस्तावित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हा प्रकल्प करण्यात येणार आहे. त्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. कार्ला येथील डोंगरावर हे मंदिर आहे. त्यामुळे पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. हा परिसर देवीच्या दर्शनासह पर्यटनासाठी आणि निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. डोंगरावरून खळाळत कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी आणि या ठिकाणापासून जवळच प्रसिद्ध लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे असल्याने या ठिकाणी पर्यटक गर्दी करतात. भाजे लेणीसह लोहगडासह अन्य शिवकालीन ऐतिहासिक किल्ले आहेत. त्यामुळे देवदर्शनाबरोरच पर्यटनासाठीही अनेक जण या भागात येतात.
रोप वे तयार करण्यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि इंडियन पोर्ट रेल आणि रोप वे कॉर्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. रज्जू मार्गाच्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक सोयींसाठी अहवाल तयार करणे, निविदा प्रक्रिया राबवणे यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि आयपीआरसीएल यांच्यात हा करार करण्यात आला होता. हा प्रकल्प बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर सुरू करण्यात येणार होता. मात्र, आता हा प्रकल्प रस्ते महामंडळाकडून करण्यात येणार आहे.
एकवीरा देवी मंदिरात दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येतात. रोप-वेमुळे एकविरा मंदिरात भाविकांना सहज पोहोचता येणार आहे, परिणामी पर्यटनाला चालना मिळणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.
महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे, शिल्प व लेण्यांचे जतन-संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते महामंडळाची (एमएसआरडीसी) निवड केली आहे. त्या अंतर्गत एकवीरा देवीच्या मंदिराचाही समावेश आहे. या मंदिराची पाहणी पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर या ठिकाणचा रोप-वे प्रकल्पही महामंडळाने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याला राज्य शासनाची मान्यताही मिळाली आहे.