पुणे – शासकीय पदभरती प्रक्रियेतील सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा उमेदवार सोमवारी एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार आहेत. एमपीएससी स्टुडंट्स राइट्स आणि एमपीएससी समन्वय समितीतर्फे टिळक चौकातील (अलका टॉकिज) केळकर पुतळ्याजवळ हे उपोषण करण्यात येणार आहे.
महापरीक्षा संकेतस्थळ बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, त्यानंतर विविध विभागांतील पदांची भरती विभागीय स्तरावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा या भरती प्रक्रियेला विरोध आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवावी, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. दरम्यान, नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत एनडी-क व एनडी-ड या प्रवर्गातील उमेदवारांना जागा कमी देण्यात आल्याने उमेदवारांमध्ये संतप्त भावना आहेत.