पुणे – अलाहाबाद बॅंकेने ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील एक्स्टर्नल बेंचमार्क निगडीत व्याजदरात 0.40 टक्क्यांची कपात जाहीर केली.
बॅंकेच्या मालमत्ता व्यवस्थापन समितीची बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी 1 मार्च 2020 पासून होणार आहे. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेने आपल्या प्रमुख व्याजदरात म्हणजे रेपो दरांमध्ये कसलाही बदल न करता तो 5.15 टक्के या पातळीवर कायम ठेवला होता. मात्र, काही क्षेत्रांना जेवढ्या प्रमाणात कर्ज दिले जाईल तेवढ्या प्रमाणात त्या बॅंकांचा रोख राखीव प्रमाण कमी केले जाईल, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले होते.
त्यामुळे बॅंकांच्या भांडवल सुलभतेमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्यामध्ये बऱ्याच बॅंकांनी आपल्या विविध कर्जांवरील व्याजदरात काही प्रमाणात कपात केली आहे. आता अलाहाबाद बॅंकेचा एक्स्टर्नल बेंचमार्क आधारित व्याजदर कमी केला आहे. रिझर्व्ह बॅंकेने पत धोरणावेळी महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे रेपोदरात कपात केली नव्हती. नंतर उपलब्ध आकडेवारीनुसार किरकोळ आणि घाऊक महागाई वाढत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये बॅंक व्याजदरात फारशी कपात करणार नसल्याचे समजले जाऊ लागले आहे.