दुबई – टी-20 विश्वचषक 2021 च्या सुपर-12 फेरीत आज इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून एकतर्फी विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 126 धावांचे आव्हान इंग्लंडने 11.4 षटकात 2 बाद 126 धावा करत पूर्ण केले.
निर्धारित धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर जसन रॉय आणि जोस बटलर यांनी 6.2 षटकांत 66 धावांची दमदार सलामी दिली. झंपाने जसन रॉयला 22 धावांवर बाद करत ही भागीदारी मोडली. यानंतर दाऊद मालन 8 धावांवर झटपट बाद झाला. दुसरीकडे जोस बटलरने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. बटलरने 32 चेंडूत नाबाद 71 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक ठरली. ख्रिस वोक्सने सामन्यातील दुसऱ्याच षटकात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला 1 धावावर बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याच्या पाठोपाठ स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोनीस झटपट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची 4 बाद 21 धावा अशी बिकट अवस्था झाली.
दुसरीकडे मैदानावर ठाण मांडून बसलेला फिंचने एकाकी झुंज देत 44 धावा केल्या. फिंच व्यतिरिक्त इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्याने ऑस्ट्रेलियाने 20 षटकात सर्वबाद 125 धावा केल्या.इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक 3 बळी घेतले.