मुंबई – तुम्ही लवंगी फटका फोडला. तोही फुस्स निघाला. पण मी दिवाळीपासून देव दिवाळीपर्यंत फटाक्यांवर फटाके फोडणार आहे. जवळपास अर्धा डझन फटाके फोडणार आहे. दिवाळीनंतर तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आणि जावयाचे तीन अशा एकूण सहा घोटाळ्यांचा पर्दाफाश करणार आहे, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला दिला आहे.
मलाड पूर्वमध्ये भाजपा दिंडोशी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना ते बोलत होते. किरीट सोमय्या म्हणाले,सध्या दिवाळी सण येत असून दिवाळीत फटाके फोडतात. मात्र, किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक, दोन, तीन, चार किंवा पाच नाही तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे.
घोटाळेबाज ठाकरे-पवारांनी 12 दिवस नाटकं केली. यात तीन मंत्र्यांच्या तीन घोटाळ्यांचा आणि त्यांच्या तीन जावयांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये जावयांचे राज्य आहे. अजित पवार यांनी त्यांच्या जावयाला खूश केले.
हसन मुश्रीफांनी त्यांच्या जावयाला आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खूश केले. एकदम बॉम्ब फोडण्याचं काम किरीट सोमय्या करणार आहे. यांनी केवळ लवंगी फटाके फोडले, असे सोमय्या म्हणाले.
ठाकरे सरकारला लाज वाटत नाही का? हिंदूह्रदयसम्राटांचं नाव घेऊन मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी आमचा विश्वासघात केला. नरेंद्र मोदींशी, भाजपशी विश्वासघात करा, पण हिंदू धर्म, संस्कृती आणि महाराष्ट्राशी विश्वासघात आम्ही खपवून घेणार नाही, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला.