पुणे – ऊन पावसाच्या खेळामुळे हवामानात झालेल्या बदलाचा परिणाम साथीच्या रोगाच्या वाढीत झाला असून, फ्लूच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. त्यातून या एका महिन्यात सुमारे 54 स्वाइन फ्लू बाधित सापडले असून, जानेवारीपासून 104 स्वाइन फ्लू बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
वातावरण बदलाचा परिणाम झाल्यानंतर साथरोगांमध्ये वाढ होतेच. परंतु पावसाळ्यात डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया, फ्लू, सर्दी, खोकला अशा आजारांमध्ये वाढ होते. दशकाआधी स्वाइन फ्लूचे रुग्ण सापडण्याला सुरूवात झाली. त्यानंतर दरवर्षी स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. यावर्षी जानेवारीपासून 104 स्वाइन फ्लू बाधित रुग्ण सापडले असून, त्यातील 54 रुग्ण एका महिन्यात सापडले आहेत.
स्वाइन फ्लूशिवाय अन्य फ्लूसदृश रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, ताप, घशातील संसर्ग अशा रुग्णांची संख्याही वाढली आहे. याशिवाय डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ झाली आहे. वातावरण बदलामुळे फ्लू चा प्रादुर्भाव होत असला, तरी डासांमुळे होणाऱ्या रोगांचा फैलाव सर्वाधिक असल्याने, डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे, पाणथळीच्या जागा साफ ठेवणे, आठवड्यातून दिवस कोरडा ठेवणे, पाण्याची भांडी वेळोवेळी साफ करणे, टायरट्यूब यांची योग्य ती विल्हेवाट लावणे, कुंड्यांच्या खालील प्लेटमध्ये पाणी साठू न देणे आदी गोष्टी करण्याविषयी महापालिकेने सूचना केल्या आहेत.
महापालिकेने याविषयी शहरभर तपासणी मोहीम सुरू केला असून, सोसायट्या, आस्थापना आणि विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत असून, डासांची अळी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.