पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात “स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती अभिनव भारत व्यासपीठा’ची स्थापना करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.20) सकाळी 11 वाजता ती होणार असल्याची माहिती महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन आपटे यांनी दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकर फर्गसन महाविद्यालयात 1902 ते 1905दरम्यान बीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी होते. येथेच त्यांनी विद्यार्थ्यांना स्वदेशी चळवळीसाठी प्रोत्साहन दिले. महाविद्यालयाच्या वसतिगृह क्रमांक एकमधील खोलीत ते वास्तव्यास होते. त्यांचे निवासस्थान असलेली खोली स्वतंत्र स्मृतिस्थळ म्हणून विकसित केली आहे. या पवित्र वास्तूलगत डीईएस नवलमल फिरोदीया विधी महाविद्यालयाची इमारत आहे.