सातारा, (प्रतिनिधी) – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बालक मंदिरात आजी-आजोबा मेळावा नुकताच उत्साहात झाला. सनईच्या सुरांसोबत औक्षण करून आणि गुलाबांच्या पाकळ्यांच्या वर्षावात करण्यात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आजी-आजोबांचे स्वागत करण्यात आले. या स्वागतामुळे आजी-आजोबा भारावून गेले होते.
शाळा समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश काजरेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शाळा समितीचे अध्यक्ष सीए. सारंग कोल्हापुरे, विश्वस्त अनंत जोशी, मुख्याध्यापिका सौ. मंजिरी देशपांडे, कोल्हापुरे यांचे आई, वडील व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. शाळा समितीचे सदस्य अमित कुलकर्णी यांनी या मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.
फळ्यावर हत्तीच्या चित्राला शेपूट काढणे, बादलीत चेंडू टाकणे, फुगडी खेळणे आणि अन्य मजेशीर खेळांचा आजी-आजोबांनी आपल्या नातवडांसमवेत आनंद घेतला. त्याचबरोबर प्रार्थना, अभंग, भजन, गवळण, एकपात्री प्रयोग आणि अन्य कलाप्रकार नातवंडांसोबत सादर केले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बहारदार नृत्ये सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
गेली सात वर्षे जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणार्या शाळेच्या बनी पथकातील चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्याने सर्वांची वाहवा मिळवली. या मेळाव्याला निमंत्रित करण्यात आल्याने, माहेरपणाला आलेल्या मुलीसारखा आनंद झाल्याची भावना डॉ. काजरेकर यांनी व्यक्त केली.
सीए. कोल्हापुरे व अनंत जोशी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. जोशी यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीची माहिती दिली. आजी-आजोबा आणि नातवंडांनी शाळेविषयी आदर, प्रेमभाव व कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांविषयी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला साजेशी मंच सजावट, फलक लेखन, बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
बनी पथकातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मेळावा यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.