पुणे – मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या जायका प्रकल्पाचा तब्बल 600 कोटींचा वाढीव खर्च अखेर महापालिका करणार आहे. या वाढीव खर्चासह या खर्चाची तरतूद योजनेचे काम संपेपर्यंत पुढील अंदाजपत्रकात करण्यास महापालिकेस मंगळवारी झालेल्या मुख्यसभेत मान्यता देण्यात आली.
तर, या प्रकल्पास उशीर होण्यास सत्ताधारी भाजपच जबाबदार असल्याचे आरोप करत हा वाढीव खर्च अनुदानाच्या स्वरुपात केंद्राकडूनच मिळावा; तसेच या योजनेची निविदा ऑफलाइनऐवजी ऑनलाइन राबविण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. मात्र, ही मागणी फेटाळत सत्ताधारी भाजपने हा प्रस्ताव मतदानाच्या जोरावर बहुमताने मंजूर केला.
केंद्र शासनाने 2016 मध्ये या प्रकल्पास मान्यता दिली होती. त्यानुसार, हा प्रकल्प 2021 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. तर, या प्रकल्पासाठी 991 कोटींचा खर्च अपेक्षित होता. त्यात, सुमारे 841 कोटींचे अनुदान केंद्राकडून मिळणार होते.
मात्र, सल्लागार नेमण्यापासून ते पहिल्या रद्द करण्यात आलेल्या निविदांपर्यंत हा प्रकल्प वादग्रस्त ठरल्याने त्यास उशीर झाला. त्यानंतर पालिकेकडून या प्रकल्पाचा आराखडा करण्यात आल्यानंतर हा प्रकल्प 1,511 कोटींवर गेला आहे. तर, या प्रकल्पासाठी पूर्वी निश्चित झालेले अनुदानच मिळणार आहे. त्यामुळे हा वाढीव खर्च महापालिकेस करावा लागणार आहे. त्याचा प्रस्ताव मुख्यसभेत येताच या कामाची निविदा प्रक्रिया ऑफलाइनऐवजी ऑनलाइन करावी, अशी मागणी शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केली. तसेच, निविदेच्या एकूण किंमतीच्या वरील रक्कम जायका किंवा केंद्र सरकारने द्यावी, अशी उपसूचना शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, विरोधीपक्षनेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी दिली होती. या उपसूचनेला भाजपने विरोध केला. यावेळी झालेल्या मतदानात 70 विरुद्ध 35 मतांनी भाजपने ही उपसूचना फेटाळून लावली. मूळ प्रस्तावाला मान्यता देत या प्रकल्पाचा वाढीव खर्च करण्यास मान्यता दिली आहे.
ठराविक ठेकेदारांसाठी घाट
या प्रकल्पासांठी ऑनलाइन निविदा मागविण्यात याव्यात, अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी मुख्यसभेनंतर पत्रकार परिषदेत केली. जायकाने स्पष्टपणे या निविदांच्या अटी-शर्थी निश्चित करताना ऑनलाइन निविदा मागविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही पालिका प्रशासनाने ऑफलाइन निविदा मागविल्या असून काही ठराविक ठेकेदारांसाठी हा घाट घातला जात असल्याची टीका बागूल यांनी यावेळी केली.