पुणे (प्रतिनिधी) – डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य प्रा. डॉ. उदय नरसिंह लिमये यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.त्यांचे शालेय शिक्षण नादेंड येथे, तर, महाविद्यालयीन शिक्षण नांदेडमधून व पदव्युत्तर शिक्षण औरंगाबादमधून पूर्ण केले. रसायनशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर त्यांनी उदगीरला अध्यापनाचे काम सुरू केले.
त्यानंतर १९७० मधे पुण्यात येऊन त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टेक्निकल इन्स्टिट्यूटमधे संचालकपदावर रुजू झाले. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्र या विषयाचे अध्यापनही केले.१९७६ ते १९८७ या कालावधीत पेंट अँण्ड पिगमेंट टेक्नॉलॉजी या विषयातील त्यांच्या ज्ञानामुळे त्यांना सुदर्शन केमिकल्समधे काम करण्याची संधी मिळाली.
तेथे त्यांनी टेक्निकल विभागाचे प्रमुखपद सांभाळले. सुदर्शन केमिकल्समधे काम करतानाही अभ्यागत व्याख्याता म्हणून त्यांनी डेक्कन एज्युकेशनच्या इनस्टिट्यूटमधे सातत्याने काम केले. त्यामुळे १९८७ मधे त्यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीने संस्थेचे आजीव सदस्यत्व देऊन सन्मानाने परत बोलावले. त्याच वर्षी स्थापन केलेल्या जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडन्स अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे संचालकपदही त्यांच्याकडे सोपवले.
पीएचडीसाठी त्यांना डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्यासारख्या गुरूचे मार्गदर्शन लाभले. जेआरव्हीजेटीआयचे संचालकपद त्यांनी निवृत्तीपर्यंत भूषविले. तरुण वयात शरीरसौष्ठव किंवा बॉडी बिल्ड़िंग या विषयात रस असलेल्या लिमये यांनी टेबल टेनिस या खेळातही प्रावीण्य मिळवले होते.