तिप्पट दराने खरेदी; थेट खरेदीमुळे पालिकेचे लाखोंचे नुकसान
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाने करोनासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करत असल्याचे भासवत आपला स्वाहाकार सुरूच ठेवला आहे. ठराविक ठेकेदार आणि एजंटच्या माध्यमातून चादर, बेडशीट, उशी, उशी कव्हर आणि नॅपकीनची खरेदी करत महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याची बाब समोर आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या करोनाने उद्रेक केला आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहे. या कोविड केअर सेंटर व संस्थात्मक विलगीकरण कक्षासाठी भांडार विभागाने सोलापुरी चादर आणि बेडशीटची थेट पद्धतीने 80 लाख 61 हजारांची खरेदी केली आहे. विशेष म्हणजे हा आदेश देताना उद्योग संचालनालयाकडील आदेश आणि दरनिश्चितीचा आधार घेण्यात आला आहे. 10 हजार पांढरे बेडशीट आणि 10 हजार सोलापुरी चादरींच्या पुरवठ्याचा आदेश हातमाग सहकारी महासंघास (महोटक्स) देण्यात आला आहे.
प्रति बेडशीट 429 रुपये 20 पैसे आणि प्रति चादर 376 रुपये 95 पैसे असा दर देण्यात आला आहे. वस्तुत: सोलापुरी चादर 90 रुपयांपासून 132 रुपयांपर्यंत, तर बेडशीट 75 रुपयांपासून 110 रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. असे असतानाही तिप्पटहून अधिकचा दर देऊन ही खरेदी करण्यात आल्याने महापालिकेचे 50 ते 60 लाख रुपये ठेकेदारावर उधळण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हा आदेश घाटकोपर येथील एका एजंटामार्फत हातमाग महासंघास देण्यात आला आहे. दरनिश्चिती ही केवळ हातमाग महासंघाच्या स्वउत्पादित साहित्यासाठी लागू असताना हे साहित्य दुसऱ्याकडून घेऊन महापालिकेस देण्यात आले आहे.
वरील दोन साहित्यावर उधळपट्टी केल्यानंतरही हव्यास पूर्णत्वास न गेलेल्या भांडार विभागातील अधिकाऱ्यांनी आणखी एक खरेदीची थेट ऑर्डर महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळास दिली आहे. या महामंडळाकडून उशी, उशीकव्हर आणि नॅपकीन घेण्यात आल्या आहेत. एका उशीसाठी 299 रुपये 72 पैसे मोजण्यात आले आहेत.
उशी कव्हरसाठी 60 रुपये 90 पैसे तर नॅपकीनसाठी 45 रुपये 41 पैसे देण्यात आले आहेत. प्रत्येकी दहा हजार नगांची 49 लाख 68 हजार 500 रुपयांचा आदेश देण्यात आला आहे. या तीनही वस्तू तिप्पटीपेक्षा अधिक दराने खरेदी करून महापालिकेचे 25 ते 30 लाखांचे नुकसान करण्यात आल्याचे समोर आले आहे. भांडार विभागाने अशा पद्धतीने कोट्यवधी रुपयांचे इतरही अनेक आदेश दिल्याचे वारंवार समोर आल्यानंतरही आयुक्त श्रावण हर्डीकर मात्र याबाबत चुप्पी साधून आहेत. त्यामुळे ही संपूर्ण खरेदी आयुक्तांच्याच आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
गादीची किंमत 430 रुपये
महापालिकेच्या भांडार विभागाने गादी खरेदीसाठी काही दिवसांपूर्वी निविदा राबविली होती. त्यावेळी 430 रुपये हा गादीसाठी लघुत्तम दर प्राप्त झाला होता. तर वेळोवेळी दरपत्रकाआधारे नॅपकीन खरेदी करताना 12 ते 20 रुपये असा दर देण्यात आला होता. निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर अत्यंत कमी रक्कमेमध्ये साहित्य उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही थेट ऑर्डर देत उशीसाठी 300 रुपये आणि कव्हरसाठी 60 रुपये देण्यात आले आहेत. म्हणजेच गादी 430 रुपयांना आणि कव्हरसह उशी 360 रुपयांना खरेदी करण्यात आली आहे. वरील वस्तूंची निविदा प्रक्रिया राबविली असती, तर महापालिकेचे किमान 60 लाख रुपये तरी वाचले असते असेच आकडेवारीवरून समोर आले आहे.
दर्जाहिन साहित्याचा पुरवठा
तिप्पट दर दिल्यानंतरही महापालिकेला जे साहित्य पुरविण्यात आले आहे, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची बाबही समोर आली आहे. सत्ताधारी नेत्याच्या एका नातेवाईकाने ही ऑर्डर घाटकोपर येथील एका एजंटाला हाताशी धरून पूर्ण केल्याने सत्ताधारी गटात “तेरी भी चूप मेरी भी चूप’चे वातावरण आहे. तर विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांचे साटेलोटे सत्ताधाऱ्यांशी असल्यामुळे त्यांनीही या विषयावर “मूग गिळून’ शांत राहणेच पसंद केले आहे.