दीड दिवसाच्या गणरायाला निरोप
पिंपरी – गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! अशी भावनिक साद घालत भाविकांनी दीड दिवसाच्या गणरायाला आज (रविवारी) निरोप दिला. करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच घाटांवर कडक बंदोबस्त असल्याने तसेच नदीपात्रात गणरायाला निरोप देण्यास मज्जाव करण्यात आल्याने घाटावर भाविकांनी मूर्तिदान केले तर काही ठिकाणी कृत्रिम तलावात बाप्पांचे विसर्जन केले.
पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी गणपती बाप्पांचे मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात आगमन झाले होते. यानंतर दीड दिवसाच्या गणरायाला आज निरोप देण्यात आला. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर तलाव व नदीमध्ये गणपती विसर्जनाला बंदी करण्यात आली आहे. शहरात साधारणपणे 26 ठिकाणी गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात येते.
या ठिकाणच्या सर्वच घाटांवर करोनामुळे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर ठिकठिकाणी मूर्ती दानाची तसेच कृत्रिम घाटाची व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेसोबतच विविध सामाजिक संघटनांनीही मूर्तिदानाची व्यवस्था निर्माण केली होती. त्यामुळे यावर्षी नदी, तलावाऐवजी सर्वच गणेशभक्तांनी अत्यंत भक्तिभावाने कृत्रिम घाटामध्ये गणरायाचे विसर्जन करून निरोप दिला.