वाई – येथील न्यायालयात गोळीबार प्रकरणातील संशयित राजेश चंद्रकांत नवघणे (वय 26) याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मेणवली (ता. वाई) येथील हॉटेलमालक आणि चालकास दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणि दरोडा प्रकरणात “मोक्का’ अन्वये कारवाई करण्यात आलेले संशयित अनिकेत उर्फ बंटी जाधव (भुईंज, ता. वाई), निखिल आणि अभिजित शिवाजी मोरे (गंगापुरी, वाई) यांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार होते.
या संशयितांना घेऊन पोलीस सोमवारी (दि. 7) दुपारी न्यायालय कक्षाबाहेरील व्हरांड्यात थांबले होते. त्यावेळी खंडणी प्रकरणातील फिर्यादी राजेश नवघणे याने या संशयितांवर गोळीबार केला. त्यावेळी मंगेश जाधव या पोलीस कर्मचाऱ्याने समयसूचकता दाखवून नवघणे याला पकडल्याने पुढील अनर्थ टाळला होता. पोलिसांनी त्याला पिस्तुलासह ताब्यात घेतले होते. नवघणे याची प्रकृती रात्री बिघडल्याने, त्याला सातारा येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला रुग्णालयातून आज सोडण्यात आल्यावर पोलिसांनी अटक करून, न्यायालयात हजर केले.
न्यायायलनो त्याला दि. 10 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालय परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी आणखी काही लोकांना ताब्यात घेतली आहे. नवघणे याने गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल कोणाकडून घेतले, यासाठी त्यांची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनीलकुमार फुलारी यांनी काल (दि. 7) रात्री वाई पोलीस ठाण्यात भेट देऊन, अधिकाऱ्यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण भालचिम, स्थानिक गुन्हे शाखोचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, कृष्णकांत पवार हे वाईत तळ ठोकून आहेत. परीविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीणा तपास करत आहेत.
मंगेश जाधव यांचे कौतुक
ही घटना घडली त्यावेळी पोलीस कर्मचारी मंगेश जाधव यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गोळीबार करणाऱ्या नवघणे याला मंगेश जाधव यांनी जीवाची बाजी लावून पकडले होते.