नवी दिल्ली – बिहारमधील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयूचा समावेश असणाऱ्या एनडीएने काठावरचे बहुमत मिळवत बिहारची सत्ता राखली. एनडीएने त्या राज्यात सरकार स्थापनही केले. मात्र, भाजपने सुशील यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. तेव्हापासूनच त्यांना राष्ट्रीय राजकारणात सामावून घेण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
त्या चर्चा सुशील यांना राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आल्याने खऱ्या ठरण्याची चिन्हे आहेत. लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) संस्थापक रामविलास पासवान यांच्या निधनामुळे बिहारमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाची एक जागा रिक्त झाली. त्या जागेसाठी आता पोटनिवडणूक होत आहे.
भाजपने आपल्या कोट्यातून ती जागा पासवान यांच्यासाठी सोडली होती. मात्र, बिहार विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्यासाठी लोजप एनडीएमधून बाहेर पडला. त्यामुळे रिक्त झालेली राज्यसभेची जागा आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यातून तूर्त तरी लोजपसाठी एनडीएचे दरवाजे बंद राहणार असल्याचेही सूचित झाले.