अग्रलेख : सुशांत, रिया, कंगना आणि बरेच काही

देशात गेल्या सहा ते सात महिन्यांपासून करोना विषाणूने धुमाकूळ घातला असून लाखो लोकांना त्याची बाधा झाली आहे, तर हजारो लोकांचा जीव गेला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये लाखो रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्व रुग्णांची देखभाल करण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा सक्षम नाही, हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे; पण या महत्त्वाच्या विषयाकडे प्राधान्याने कोणाचेच लक्ष नाही, पण बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने दोन महिन्यांपूर्वी केलेल्या आत्महत्येचा विषय अद्यापही ब्रेकिंग बातम्यांचे भांडवल बनला आहे, हे विशेष.

गेल्या काही दिवसांत देशातील विविध वृत्तवाहिन्यांनी बातम्यांमध्ये प्राधान्याने घेतलेला विषय पाहता सुशांत सिंह राजपूत, त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि या वादात विनाकारण उडी घेतलेली वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत याव्यतिरिक्‍त कोणताही विषय माध्यमांना प्राधान्याचा वाटत नाही, हीच गोष्ट सिद्ध होत आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्येचा विषय नेहमीच राजकारण्यांनी आपल्या फायद्यासाठी वापरला. अद्यापही त्याचसाठी त्याचा वापर केला जात आहे. सुशांतने आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यावर प्रथम बॉलीवूडमधील घराणेशाहीच्या प्रभावाला कंटाळून त्याने आपले जीवन संपवले, अशी एक थिअरी मांडण्यात येत होती; पण आता या थिअरीचा विषय समोर येत नाही. कारण आता या आत्महत्येला ड्रग कनेक्‍शन जोडण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी महिना ते दीड महिना तपास केल्यानंतर जेव्हा हे प्रकरण सीबीआयच्या ताब्यात गेले त्यानंतर वेगाने घडामोडी घडून सुशांतच्या आत्महत्येमागील अंमली द्रव्यांचा संबंध समोर आला. अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्यूरोने तातडीने कारवाई करून अनेक लोकांना ताब्यात घेतले.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दोनच दिवसांपूर्वी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिलाही अटक केली आहे. इकडे रियाने सुशांत सिंहच्या बहिणीवर आरोप करून तिने चुकीची औषधे दिल्यामुळे सुशांत सिंहचा मृत्यू झाला, असा दावा केला आहे. या सर्व गुंतागुंती कमी होत्या म्हणून की काय बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न उपस्थित करून विनाकारण हा विषय दुसरीकडे वळवला. वृत्तवाहिन्यांना आणि माध्यमांना असे विषय चघळायला हवेच असतात. कंगना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामधील कलगीतुरा सर्वांना बऱ्याच ब्रेकिंग न्यूज देऊन गेला. याच कालावधीमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन पार पडल्याने या अधिवेशनामध्ये कंगना आणि रिपब्लिक टीव्हीचा संचालक अर्णव गोस्वामी यांच्यावर हक्‍कभंगाचा ठरावही आणण्यात आला. देशातील सामान्य नागरिकांच्या दृष्टीने नॉन इश्‍यू असलेल्या या विषयांचा गेल्या काही दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात इश्‍यू करण्यात आला आहे की, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न बनलेल्या करोना विषाणूच्या महासंकटाकडेही दुर्लक्ष होते की, काय अशी भीती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र विधिमंडळात कंगना आणि अर्णव गोस्वामी यांच्यावरील हक्‍कभंग ठरावावर जेवढी तावातावाने चर्चा झाली, एवढ्या गांभीर्याने राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या सद्यस्थितीवर चर्चा झाली नाही. केवळ महाराष्ट्राच्या पातळीवर असे राजकारण खेळले जात आहे असे नव्हे, सुशांत सिंहच्या आत्महत्येचा विषय राष्ट्रीय विषय करून महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करण्याचे कारस्थान केले जात असावे, अशी शंका घ्यायला वाव आहे. सुशांत सिंह मूळचा बिहारचा असल्याने त्याच्या मृत्यूचा विषय निश्‍चितच बिहारमधील सध्याच्या निवडणुकीच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या हातातून तपास काढून घेऊन तो सीबीआयच्या ताब्यात दिल्यानंतर विषय अधिकच तीव्रतेने समोर आला.

महाराष्ट्र सरकार आणि कंगना यांच्यामधील संघर्ष सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने लगेच कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान केली. यामागे कोणते राजकारण नाही, असे मुळीच म्हणता येणार नाही. देशातील सध्याची परिस्थिती काय आहे, याचा कोणताही विचार न करता सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर फक्‍त राजकीय कुरघोड्या करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असाच निष्कर्ष दुर्दैवाने काढावा लागत आहे. अशा परिस्थितीचा लाभ समाजकंटक घेतात, हे दाऊद इब्राहिमच्या नावाने मातोश्रीवर आलेल्या फोनवरून स्पष्ट होते. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही गेल्या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये धमकीचे अनेक फोन आले आहेत. हे सर्व फोन हिमाचलमधून आले, असे समजते. एखादा विषय अशाप्रकारे पेटला असताना समाजकंटक त्याचा फायदा घेण्यासाठी अशाप्रकारे आपल्या यंत्रणेचा वापर करतात, असे यापूर्वी अनेक वेळा सिद्ध झाले आहे. या धमकी प्रकरणाचाही मुळापासून शोध घेण्याची गरज आहे.

माध्यमे आणि वृत्तवाहिन्यांना आपापला टीआरपी वाढवायचा असल्याने विकल्या जाणाऱ्या बातम्यांना प्राधान्य दिले जाणे समजण्यासारखे असले, तरी सामान्य नागरिकांना मात्र सुशांत सिंहच्या आत्महत्येसारखे विषय अत्यंत महत्त्वाचे वाटण्याचा धोका अशा धोरणातून निर्माण होऊ शकतो. सुशांतचे आत्महत्या प्रकरण, त्याच्या मैत्रिणीचे ड्रग कनेक्‍शन आणि कंगनाने निर्माण केलेला वाद यांच्यापेक्षाही अनेक ज्वलंत विषय सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे, बेरोजगारी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे, हातावर पोट असणाऱ्या अनेक छोट्या व्यावसायिकांचे उपजीविकेचे साधन बंद झाले आहे, करोना विषाणूच्या महासंकटाच्या कालावधीमध्ये केवळ उपचार उपलब्ध नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या बातम्याही समोर येत आहेत, पण या सर्व बऱ्याच काही गंभीर गोष्टींपेक्षाही सुशांत सिंहची आत्महत्या प्रकरण आणि त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीला झालेली अटक, कंगनाने निर्माण केलेला वाद, हाच महत्त्वाचा विषय ठरू पाहात आहे.

एखाद्या नॉन इश्‍यूचा अशाप्रकारे इश्‍यू केल्यामुळे सामान्य नागरिकांना हाच विषय सर्वात महत्त्वाचा आणि जीवन-मरणाचा वाटू शकतो, हा धोका तरी आता लक्षात घ्यायला हवा. देशातील करोनाची परिस्थिती आता हाताबाहेर जाऊ लागल्याने या महासंकटाच्या व्यतिरिक्‍त इतर कोणताही विषय महत्त्वाचा असू शकतो, हे सध्यातरी कोणालाही मान्य होण्यासारखे नाही. विविध माध्यमे आणि राजकीय पक्ष त्याच दिशेने आता आगामी काळात विचार करतील अशी आशा करायला हवी. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.