बालाजी देडगाव: नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव व परिसरात चक्रीवादळ व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख व खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली. यावेळी घटनास्थळी आपल्या कार्यकर्त्यांसह भेट देत या नेत्यांनी नुकसानग्रस्तांना धिर दिला. तसेच शासनदरबारी पाठपुरावा करीत त्वरित मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आपल्या कार्यर्त्यांसह या भागातील नुकसानग्रस्त घरे व फळबागा यांना भेट देत पाहणी केली. त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच शासनदरबारी पाठपुरावा करीत आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी तहसीलदार रुपेश सुराणा, सहायक गटविकास अधिकारी पाखरे, कृषी अधिकारी डमाळे, कामगार तलाठी कोकणे, ग्रामविकास अधिकारी शेलार,कृषीसहायक काळे, संभाजी काजळे आदी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी आमदार शंकरराव गडाख यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह चक्रीवादळात नुकसान झालेली घरे व फळबागा यांना भेट देत पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती माजी आमदार गडाख यांना दिली. आमदार गडाख यांनीही शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्तांना मदतीचे आश्वासन दिले. यावेळी शेतकऱ्यांना आपल्या समस्या माजी आमदार गडाख यांच्यापुढे मांडल्या.
खासदार सदाशिव लोखंडे यांनीही बालाजी देडगाव व परिसरातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी भेटी दिल्या. त्यांनी माजी सरपंच रमेशदादा हिवाळे यांच्या नुुुकसानग्रस्त घराची तसेच परिसरातील आपत्तीग्रस्त भागाची पाहणी केली. खा. लोखंडे यांनी नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच नुकसान झालेल्या सर्व आपत्तीग्रस्तांना मदत मिळण्याचे आश्वासन दिले. तसेच विज कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. यावेळी भाजपाचे दिनकर गर्जे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के, शिवसेना नेते रामदास गोल्हार, रामानंद मुंगसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.