नवी दिल्ली – फरार उद्योगपती मेहुल चोक्सी आणि त्याच्या पत्नीला बुधवाराी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका देत गुजरात पोलिसांनी दाखल केलेला फसवणूकीचा खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उच्च न्यायालयाने 2017मध्ये दिलेल्या एफआयआर रद्द करण्याचा आदेशाला स्थगिती दिली आहे.
न्या. संजीव खन्ना आणि न्या. एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. पीएनबी घोटाळयातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी यांच्यावर 14,000 कोटी रुपयांहून अधिक बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी दिग्विजयसिंह हिम्मतसिंह जडेजा यांनी 2015 मध्ये गुजरातमध्ये तक्रार नोंद केली होती. या तक्रारीवरून नोंदवलेल्या एफआयआरनुसार चोक्सी आणि त्याच्या पत्नीवर 30 कोटी रुपयांच्या 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या बारांच्या व्यावसायिक व्यवहाराच्या संबंधात बनावट आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे.
न्या. संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निर्देश दिले की, गुजरात उच्च न्यायालयाचा 5 मे 2017 चा आदेश बाजूला ठेवत पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू ठेवावी.
या आदेशातील निरीक्षणे केसच्या गुणवत्तेवर टिप्पण्या किंवा निरीक्षणे म्हणून वाचली जाणार नाहीत. सध्याच्या आदेशात केलेल्या कोणत्याही निष्कर्ष किंवा निरीक्षणांवर प्रभाव न पडता तपास सुरू राहील, असे खंडपीठाने म्हटले आहे.