पुणे – पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना आर्थिक साहाय्य करण्याबरोबर बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी अटक करण्यात आलेल्या आयटी इंजिनिअरने मदत केल्याचे राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात समोर आले आहे.
पुणे पोलिसांच्या कोथरूड बीट मार्शलवरील कर्मचाऱ्यांनी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय 24), मोहम्मद युसूफ मोहम्मद याकूब साकी (वय 23, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा. मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना अटक केली.
दरम्यान, कोंढव्यात या दोघांना आश्रय देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय 32, रा, कोंढवा) यालाही गजाआड करण्यात आले. तर, नुकतीच या दहशतवाद्यांना बॉम्ब बनविण्यासाठीचे साहित्य खरेदी करून दिल्याच्या आरोपावरून सिमाब नसरूद्दीन काझी (वय 27, कौसरबाग, कोंढवा मुळ. पंढेरी, रत्नागिरी) या मेकॅनिकल इंजिनिअरलाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडील चौकशीत त्याने रोख व ऑनलाइन पद्धतीने पैशाची मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे.
एटीएसच्या पथकाने मोहम्मद खान, मोहम्मद साकी यांच्याकडून बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त केले आहे. हे साहित्य ज्या ठिकाणावरून काझी याने खरेदी केले त्याठिकाणची च0ौकशीही करण्यात आली आहे. मोहम्मद खान या दहशतवाद्याने बॉम्ब बनविण्यासाठी केमिकल्स आणि प्रयोगशाळेतील उपकरणे लपवून ठेवले होते. एटीएसने केलेल्या तपासात केमिकल्स आणि उपकरणे मिळून आली आहेत.