मेट्रोची वेळ : सकाळी 7 ते रात्री 10
वारंवारिता : 10 ते 15 मिनिटे
पुणे – शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू करणाऱ्या मेट्रोच्या विस्तारीत मार्गाचे पुणेकरांनी जल्लोषात स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनाज ते सिव्हिल कोर्ट आणि रूबी हॉल ते सिव्हिल कोर्ट तसेच सिव्हिल कोर्ट ते पिंपरी हे विस्तारीत मार्गाचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर सायंकाळी पाच पासून पुणेकरांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गांना चांगलीच पसंती दिली. या मार्गावर तिकिट काढण्यासाठी नागरिकांनी रांगाही लागल्याचे पहायला मिळाले.
सुमारे दिड वर्षांपूर्वी वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली होती. सुरूवातीला पुणेकरांनी त्याला चांगला प्रतिसादही दिला. मात्र, या मार्गावर जास्त प्रवासी नसल्याने मेट्रोचा फारसा वापर केला जात नव्हता. मात्र, आता दोन शहरे जोडल्याने तसेच रूबी हॉल ते वनाज या मार्गामुळे शहराचा पूर्व आणि पश्चिम भाग जोडला गेल्याने नागरिकांना मोठ्या अंतरापर्यंत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी पहिल्याच दिवशी मेट्रो प्रवासाला पसंती दर्शविली.
वकिलांनी केली मेट्रो सफर…
दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचे उद्घाटन होताच शिवाजीनगर न्यायालयातील 30 ते 40 वकिलांनी मेट्रोच्या सफरचा अनुभव घेतला. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी येथील शेवटच्या स्टॉप असा 22 मिनिटांचा ही सफर अनुभवली. त्यानंतर तेथून पुन्हा सिव्हिल कोर्ट असा प्रवास केला. यामध्ये युवा वकिलांचा सहभाग अधिक दिसून आला. विस्तारीत मार्ग सायंकाळी पाच नंतर सुरू झाला. त्यामुळे अनेक वकिलांनी न्यायालयातील कामकाजानंतर मेट्रोची सफर अनुभवली.