पुणे-नगर रस्त्यावर अपघात; 29 प्रवासी जखमी
पुणे –पुणे-नगर रस्त्यावर बीआरटी मार्गात दोन बसची समोरासमोर धडक झाली. अपघातात चालक आणि वाहकासह 29 प्रवासी जखमी झाले. दरम्यान पोलीस पंतप्रधान दौऱ्याच्या बंदोबस्तावर असल्याने घटनास्थळी धाव घेण्यासाठी त्यांची मोठी धावपळ उडाली. यातील जखमींना ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एक बस इलेक्ट्रीक तर दुसरी सीएनजीची होती. सुदैवाने सीएनजीचा किंवा बॅटरीचा स्फोट झाला नाही.
तळेगाव ढमढेरे ते महापालिका भवन या मार्गावरील पीएमपी बस मंगळवारी सकाळी नगर रस्त्यावरून पुण्याकडे निघाली होती. नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गात विरुद्ध दिशेने वाघोलीकडे निघालेल्या पीएमपी बसने समोरुन येणाऱ्या बसला धडक दिली.
अपघातानंतर बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. यात बसचे चालक, वाहकांसह 29 प्रवासी जखमी झाले, गंभीर दुखापत कोणला झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना मदत केली. एका बसचा दरवाजा चेपला गेल्याने प्रवाशांना खिडकीच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आले. जखमी प्रवासी मदत मिळेपर्यंत रस्त्याकडेला बसून होते. अनेकांच्या डोक्याला, हाताला, चेहऱ्याला मार लागला आहे. पीएमपीकडून अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.