ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ
www.mahresult.nic.in
पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा ऑनलाइन निकाल बुधवारी (दि.23) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. बोर्डाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण उपलब्ध होतील. तसेच, माहितीची प्रत घेता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
दहावी व बारावीच्या लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची दरवर्षी पुरवणी परीक्षा घेतली जाते. फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये बारावी व दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात करोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले.
यानंतर जुलैमध्ये निकाल जाहीर झाले. करोनाच्या प्रभावामुळे पुरवणी परीक्षा होणार की नाही याबाबत साशंकता होती. राज्य मंडळाकडून ऑक्टोबरमध्ये पुरवणी परीक्षेच्या आयोजनाबाबत शासनास प्रस्ताव पाठवला होता. करोनाची परिस्थिती पाहून नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत परीक्षा झाली. यानंतर लगेचच निकाल जाहीर होत आहे.
ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी दि. 24 डिसेंबर ते 12 जानेवारी व छायाप्रतीसाठी दि. 24 डिसेंबर ते 12 जानेवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची श्रेणी/गुणसुधार योजनेंतर्गत परीक्षेस पुन्हा प्रविष्ठ होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार नोव्हेंबर-डिसेंबरच्या दहावी व बारावी परीक्षेत सर्व विषय घेऊन प्रथमच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील सलगच्या दोन संधी उपलब्ध राहणार आहेत.