पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) लांब पल्ल्याच्या बसमार्गांची पुनर्रचना करून, मर्यादित स्थानकांचा समावेश असणारी लिमिटेड सेवा (एलटीडी) सुरू करण्यात येणार आहे. या बसेस 25 डिसेंबरपासून धावणार आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) मुंबईतील बेस्टच्या धर्तीवर पुण्यात प्रथमच “एलटीडी’ राबविण्यात येणार आहे. या बससेवेंतर्गत ठराविक थांब्यांवरच बसेस थांबणार आहेत. पहिल्या टप्प्यात ही बससेवा 11 मार्गांवर प्रायोगिक तत्वावर सुरू होणार आहे.
कात्रज ते निगडी, भेकराईनगर ते एनडीए गेट, भेकराईनगर ते निगडी मार्गांवरील 2 बसेस, भेकराईनगर ते आळंदी, भेकराईनगर ते चिंचवडगाव, भेकराईनगर ते हिंजवडी माण फेज 3, भेकराईनगर ते कात्रज, निगडी ते वाघोली, निगडी ते पुणे स्टेशन, निगडी ते हिंजवडी या मार्गांवर “एलटीडी’ सेवेअंतर्गत बसेस धावणार आहेत.
यासाठी प्रत्येक मार्गांवर 13 ते 18 बसथांबे निश्चित केले आहेत. यासाठी ई-बस सोडण्यात येणार आहेत. प्रत्येक “एलटीडी’ बस दर 30 आणि 60 मिनिटांनी प्रत्येक मार्गांवर धावणार आहेत. तर यासाठी 25 ते 50 रुपयांपर्यंत तिकीट दर असेल. बससेवेत सुधारणा करणे आणि अधिक चालना देण्यासाठी ही सेवा राबविण्यात येणार आहे.
प्रामुख्याने प्रवासाचा वेळ वाचवणे, इच्छितस्थळी लवकर पोहोचणे आणि सेवेचा वेग वाढवण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले.