पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या ऑनलाइन अर्जप्रक्रियेला बुधवारपासून (दि.23) सुरुवात होत आहे. दि. 11 जानेवारीपर्यंत नियमित विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. तसेच पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार, खासगी व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना दि. 12 ते 25 जानेवारी 2021 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
लॉकडाऊनमुळे दहावीचा मार्च 2020 परीक्षेचा निकाल जुलैमध्ये जाहीर झाला. 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. यंदाची परीक्षा मार्चऐवजी एप्रिल-मे या कालावधीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारावीप्रमाणेच दहावीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने व विशेषत: आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षात घ्यावी, अशी सूचना राज्य मंडळाकडून सर्व माध्यमिक शाळांना करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी सरल डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे. सरल डेटावरूनच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत. कौशल्य सेतु अभियानाचे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट मागणाऱ्या विद्यार्थ्यांनीदेखील ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून विषयासमोर ट्रान्सफर ऑफ क्रेडिटची नोंद करावी. अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारे भरायचे आहे.
नव्याने फॉर्म नं. 17 द्वारे नोंदणी करणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांची 2021 मधील परीक्षेची अर्ज भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जाणार असल्याने या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात येवू नयेत. शाळांनी दि. 23 डिसेंबर ते 1 फेब्रुवारी या कालावधीत अर्जाचे चलन डाऊनलोड करून बॅंकेत शुल्क भरायचे आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.