शारजा – सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि रूध्दिमान साहा यांच्या नाबाद आणि दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 10 गडी राखून पराभव करत दमदार विजय साकारला. या विजयासह हैदराबादने प्लेआॅफमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.
मुंबई इंडियन्सने दिलेले 150 धावांचे आव्हान हैदराबादने 17.1 षटकात 151 धावा करत आणि एकही गडी न गमावता पूर्ण केलं. हैदराबादकडून वॉर्नरने 56 चेडूंत 82 आणि साहाने 44 चेंडूत 58 धावा केल्या. हैदराबादच्या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्सचे प्लेआॅफमध्ये स्थान मिळविण्याचे स्वप्न धुळीला मिळाले.
तत्पूर्वी,हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. त्यानंतर कॅरन पोलार्डने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 8 बाद 149 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली होती.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. या सामन्यासाठी मुंबईचे नेतृत्व नियमित कर्णधार रोहित शर्मानेच केले. मुंबईच्या डावाची सुरुवातच खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा केवळ 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर ठरावीक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले.
कॉन्टन डीकॉक 25, सूर्यकुमार यादव 36 व इशान किशन 33 यांनी उपयुक्त खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठी धावसंख्या उभारण्यात त्यांना अपयश आल्याने त्यांचा डाव 7 बाद 116 असा अडचणीत आला होता. त्याचवेळी कॅरन पोलार्डने अचानक आक्रमक खेळ केला. त्याने 19 व्या षटकांत 3 षटकार फटकावले. तसेच अखेरच्या षटकांतही त्याने आक्रमक फटकेबाजी केली. मात्र, त्याला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. तो 41 धावांवर जेसन होल्डरच्या चेंडूवर त्रिफळाबाद झाला.
त्याने 25 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 4 षटकार फटकावले. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबईने 8 बाद 149 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. हैदराबादकडून संदीप शर्माने 3 गडी बाद केले. त्याला योग्य साथ देताना जेसन होल्डर व शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.