मुंबई – कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी अभिनेता सनी देओल याच्या जुहु येथील बंगल्याचा लिलाव केला जाणार आहे. सरकारी मालकीच्या बॅंक ऑफ बडोदाने 25 ऑगस्ट रोजी हा लिलाव ठेवला असून त्यांच्याकडे असलेल्या 56 कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी ही कारवाई केली जाणार आहे.
सनी देओल हे भाजपचे गुरूदासपुर येथील खासदार आहेत. त्यांचा “गदर 2′ हा अलिकडेच प्रदर्शित झालेला सिनेमा सुपरहिट झाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आपल्या घराच्या लिलावाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
त्यांच्यावर डिसेंबर 2022 पासून बॅंकेचे 55.99 कोटी रुपयांचे कर्ज आणि व्याज तसेच दंड थकित आहे. त्यांचा हा “सनी व्हिला’ हा बंगला बॅंकेने जप्त केला असून त्याच्या ई-लिलावासाठी 51.43 कोटी रुपयांची राखीव किंमत आणि 5.14 कोटी रुपयांची बयाणा ठेव निश्चित केली आहे.
त्यांच्यावरील कर्जाला त्यांचे वडिल धर्मेंद्र हे वैयक्तीक जामीनदार आहेत. हा लिलाव थांबवायचा असल्यास कर्जाची परतफेड त्वरीत करण्याचा पर्यायही सनी देओल यांच्यापुढे आहे असे बॅंकेने म्हटले आहे.