पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांची भेट घेऊन दिल्या सूचना
जामखेड – शहरासह तालुक्यातील शाळांमध्ये रोडरोमिओंचा धुमाकूळ वाढला असून, त्यांच्यावर कोणाचाही धाक उरलेला नाही. त्याचा विद्यार्थिनींना त्रास होत आहे. याबाबत बारामती डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सुनंदाताई पवार यांनी दाखल घेतली असून, त्यांनी जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी भेट घेऊन त्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत.
जामखेड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये मुली शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून येतात. एसटी किंवा खासगी वाहनांतून प्रवास करताना छेडछाडीच्या घटनांचा मुलींना सामाना करावा लागतो. घर सोडल्यापासून तर शाळा, महाविद्यालयापर्यंत ते परत घरी येईपर्यत मोठा त्रास सहन करून आपली शिक्षणफेरी करावी लागते. शहरात खासगी शिकवणी चालकांनी सकाळी पाचपासून शिकवण्यांचे वर्ग सुरू केले आहेत.
त्यामुळे मुलींना घरातून सकाळी सहा ते साडेसहा वाजता बाहेर पडावे लागत आहे. रस्त्यावर अंधार असतो. अशा परिस्थितीमुळे एकट्या-दुकट्या मुलींचा पाठलाग करून छेड काढली जात आहे. रोडरोमिओंचा मोठ्या प्रमाणावर उच्छाद वाढला असून, विना क्रमांकाची मोटारसायकल पळविणे, मुलींच्या जवळ जाऊन ब्रेक मारणे, मोठ मोठ्याने हॉर्न, शिट्या वाजविणे, असे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. लोकलाजेस्तव मुली त्रास सहन करून गप्प राहत आहेत. याचा गैरफायदा ही टोळी घेत आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालये सुटण्या व भरण्याच्या वेळेलाही परिसरात व रस्त्यांवर हे टोळके हमखास उभे राहून मुलींवर अश्लिल कॉमेंट करीत आहेत.
शहरातील नवीन तहसील कार्यालयाजवळ, बीड कॉर्नर, खर्डा चौक, तहसील कार्यालय, नगर रोड, एमएसईबी कॉर्नर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोडरोमिओंची गर्दी असते. बीड रस्त्यावरवरही दुचाकीवरून भरारी मारणारे टोळके पहावयास मिळतात. आजवर चिडीमार पथकाने कारवाई केल्याचे ऐकीवात नाही? कोणाची भीतीच राहिली नसल्याने मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत.
याबाबत अनेक मुलींनी सुनंदाताई पवार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने पवार या जामखेड शहरात आल्या असता त्यांनी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून यावर कसा मार्ग काढता येईल, तसेच शहरात व तालुक्यात पोलिसांनी रोडरोमिओंविरोधात कडक भूमिका घ्यावी. जेणेकरून मुली शाळेत जाऊ शकतील.
तसेच महिलांच्या व मुलीच्या सुरक्षिततेसाठी जामखेड तालुक्यासाठी पल्लवी माने यांची जामखेड तालुका समन्व्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुलींना कुणी त्रास देत असेल, तर त्यांनी माने यांच्याशी 7498905594 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे