सुकमा – कुठल्याही जिल्हाधिकाऱ्याचे छायाचित्र काढायचे म्हटले तर स्वाभाविकपणे त्यांच्या कार्यालयात ते खुर्चीवर बसलेल्या स्थितीत साधारणपणे काढण्यात येते. परंतु छत्तीसगढ राज्यातील नक्षलप्रभावित सुकमा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची गोष्टच काही वेगळी आहे. शारिरिक तंदुरुस्तीबाबत अतिशय जागरुक असलेले जिल्हाधिकारी विनीत नंदनवार हे स्वतः शरीरसौष्ठवपटू आहेत.
त्यांचे सिक्स पॅक शरीर पाहून कसलेले शरीरसौष्ठवपटू चकीत होतात. त्यामुळेच त्यांचे सिक्स पॅक आणि ऍब्ज पाहून लोक अचंबित होतात. गेल्या काही दिवसात त्यांची अनेक छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल झालेली आहेत. त्यामध्ये शर्ट न घालता काढलेल्या त्यांच्या छायाचित्रातून सौष्ठवपूर्ण शरीर दिसते.
विनीत नंदनवार हे मूळचे जगदलपूरचे आहेत आणि सरकारी शाळेत त्यांचे शिक्षण झाले आहे. ते वर्ष 2013 च्या तुकडीचे आयएएस आहेत. सुकमाचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारण्याआधी ते रायपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी होते. सुमारे एक महिन्यांपूर्वीच त्यांनी सुकमाच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे.
तंदुरुस्ती आणि जीवनशैलीबाबत आपण पहिल्यापासूनच सजग असल्याचे ते सांगतात. कितीही काम असले तरी रोज वेळ काढून ते व्यायाम करतात. ते म्हणतात, कुणी कितीही व्यस्त असले तरी स्वतःच्या आरोग्यासाठी रोज नियमितपणे एक तास तरी काढू शकतो. जीवनात सुख-दुःख येत जात राहतात. कठीण प्रसंगात माणूस मानसिकदृष्ट्या खंबीर बनतो. अशा काळात त्रासून जाऊन उपयोग नसतो. युवकांनी तर कायम तंदुरुस्त राहिले पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे. मात्र, शरीर सौष्ठवपूर्ण बनण्यासाठी कधीही पावडर, औषधे किंवा स्टेरॉईड घेऊ नयेत. यापासून तरुणांनी लांब रहावे.