पुणे – तीनवर्षीय विधी (लॉ) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्य सीईटी सेलने जाहीर केलेल्या निकालात चार विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळाले आहेत.
राज्य सीईटी सेलमार्फत तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्यात आली. या निकालात चार विद्यार्थ्यांना सर्वाधिक 118 गुण मिळाले. गुणवत्ता यादीतील पहिल्या दहा उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये तब्बल नऊ मुलींनी बाजी मारली.
यंदा करोनामुळे तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा लांबणीवर गेली होती. 2 आणि 3 नोव्हेंबर या कालावधीत सीईटी परीक्षा आयोजित केली होती.
या परीक्षेसाठी राज्यभरातून 55 हजार 467 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी 43 हजार 579 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.