कोल्हापूर विभागात ऊस उत्पादनात घट

पुणे – दोन महिन्यांच्या कालावधीत दोनवेळा बसलेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या फटक्‍याने कोल्हापूर विभागातून 1 कोटी 72 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे. ही घट 53 लाख टनांची असून, त्यामुळे साखर उत्पादनाला त्याचा मोठा फटका बसणार आहे. याची सर्वाधिक झळ कोल्हापूर जिल्ह्याला बसणार आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादनाला फारशी झळ बसलेली नाही.

पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बहुतांशी ऊस हा नदीकाठी आहे. दोन महिन्यांत या पिकाला मोठा फटका बसला आहे. पहिल्या पुराचे पाणी 8 ते 10 दिवस तर दुसऱ्या पुराचे पाणी 5-6 दिवस या पिकात राहिल्याने ऊस खराब झाला आहे.

शिरोळ तालुक्‍यातील ऊस सार्वाधिक काळ पाण्याखाली राहिल्याने याठिकाणी तुलनेत अधिक झळ बसली आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 61 हजार 999 हेक्‍टरवरील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे.

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने घेतलेल्या आढाव्यात कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानीचा अंदाज लावण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.