साखर कारखानदारांना दणका; ‘एफआरपी’ न भरल्याने परवाने रोखले

कोल्हापूर: ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्या एफआरपीच्या मुद्यावरून कायमच बेबनाव असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना तातडीने एफआरपी देण्यात यावा या साठी सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन देखील छेडण्यात आले आहे. त्यामुळे एफआरपीच्या मुद्यावरून साखर आयुक्तांनी देखील साखर कारखान्यांना दणका दिला असून, ज्यांनी अद्याप एफआरपी ची रक्कम भरली नाही अशा सात कारखान्यांचा गाळप परवाना साखर रोखून धरला आहे.

यातील बहुतांशी कारखान्यांनी गेल्या दोन ते तीन वर्षातील एफआरपीची रक्कम दिलेली नाही. यामध्ये हलकर्णी मधील दौलत , हमीदवाडा मधील मंडलिक यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. तर विभागातील सात कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला नसल्याची माहिती समोर आली आहे.

यामध्ये कोल्हापूर मधील दोन आणि सांगलीतील तीन कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी या दोन्ही जिल्ह्यातून 38 कारखान्यांनी हंगाम घेतला होता. मात्र यावर्षी सांगली जिल्ह्यातील किमान तीन ते चार कारखाने सुरू होणार नसल्याचे वास्तव आहे.

दरम्यान प्रलंबित असलेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीचा उदयसिंगराव गायकवाड साखर कारखाना, रिलायबल शुगर अँड डिस्टिलरी, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, गडहिंग्लज साखर कारखाना, दौलत सहकारी साखर कारखाना, कुंभी कासारी साखर कारखाना, केन ऍग्रो एनर्जी, वारणा साखर कारखाना, आजरा साखर कारखाना, महाकाली साखर कारखाना तर सांगलीतील यशवंत शुगर अँड पॉवर प्रा. लि, राजारामबापू पाटील साखर कारखाना, माणगंगा साखर कारखाना यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.