सातारा – येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुदेष्णा हणमंत शिवणकर हिची चायना- चेंगडू येथे दि. 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेसाठी भारतीय विद्यापीठ संघात निवड झाली आहे. सुदेष्णा 100 मीटर व 4 बाय 100 मीटर रिले या दोन्ही क्रीडा प्रकारांत भारतीय विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धा चेन्नई (तमिळनाडू) येथे दि. 13 ते 16 मार्च या कालावधीत झाल्या होत्या. या स्पर्धेत सुदेष्णाने 100 मीटर धावणे मध्ये सुवर्णपदक मिळवत अखिल भारतीय विद्यापीठाची वेगवान धावपटू म्हणून किताब मिळविला आहे.
त्याच स्पर्धेत सुदेष्णाने 200 मीटरमध्ये रौप्य पदक मिळविले. लखनौ (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेत सुदेष्णाने 200 मीटरमध्ये सुवर्ण व 100 मीटरमध्ये रौप्य पदक मिळवले. विविध स्पर्धांमधील सुदेष्णाच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तिची निवड झाली आहे. जागतिक विद्यापीठ स्पर्धेसाठी आवश्यक असणारे पात्रता निकष पूर्ण करीत असल्याने सुदेष्णाची भारतीय विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
मागील वर्षी कोलंबिया (दक्षिण अमेरिका) येथे झालेल्या अंडर 20 ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुदेष्णाने देशाचे प्रतिनिधित्व केले होते. आता पुन्हा वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये सुदेष्णा देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. सुदेष्णाचे गुरु बळवंत बाबर यांनी गेली पाच- सहा वर्ष सुदेष्णासाठी खूप मेहनत घेतली आहे.
देशासाठी आंतरराष्ट्रीय धावपटू घडावा यासाठी श्री. बाबर मेहनत घेत आहेत. त्यांच्या मेहनतीचे यश म्हणूनच सुदेष्णा जागतिक पातळीवर आपली बहारदार कामगिरी करत जिल्ह्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.