सिडनी – महिलांच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानची कर्णधार जावेरिया खान विचित्र पद्धतीने धावबाद झाली. खरेतर केवळ नशीब म्हणून प्रतिस्पर्धी संघ तिला बाद करू शकला. या पद्धतीने बाद झाल्याने निराश झालेल्या जावेरियाने धावबाद ठरण्याच्या या पद्धतीवर आक्षेप घेत हा नियम बदलण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार जावेरियाने 34 चेंडूत 31 धावा केल्या होत्या. पाकिस्तानच्या डावातील 11 व्या षटकात दक्षिण आफ्रिकेची गोलंदाज ट्रायन हिच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर आलिया रियाझने स्ट्रेट ड्राइव्हचा फटका मारला.
तो ट्रायनच्या हाताला लागून यष्टीवर गेला, त्यावेळी जावेरियाने क्रीझ सोडले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने केलेले अपील ग्राह्य धरत पंचांनी जावेरियाला धावबाद घोषित केले.