नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध पुरवठ्यावरून भारताला दिलेल्या धमकीबद्दल कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटवर या विषयीची प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले आहे की, मी अनेक दशके जागतिक व्यवहार या क्षेत्रात काम केले आहे; पण कोणत्याही राष्ट्रप्रमुखाने दुसऱ्या देशाला दिलेली अशा स्वरूपाची धमकी आपण कधी ऐकली नाही.
ट्रम्प यांनी या औषधांच्या संबंधात आवर सप्लाय असा शब्दप्रयोग वापरला होता. त्यालाही आक्षेप घेताना थरूर यांनी म्हटले आहे की, भारताचा हायड्राक्सिक्रोरोक्वीन हा तुम्हाला तुमचा सप्लाय कसा वाटतो आहे आहे मिस्टर अध्यक्ष? भारताने या औषधांची विक्री तुम्हाला करण्याचा निर्णय घेतला तर तो तुमच्यासाठीचा सप्लाय (पुरवठा) ठरतो. भारताकडून ही औषधे मिळणे हा आपला अधिकारच आहे अशा थाटात ट्रम्प बोलत असल्याचे थरूर यांनी निर्देशित केले आहे.
शशी थरूर यांनी भारतात येण्यापूर्वी अनेक वर्ष संयुक्तराष्ट्रांच्या कार्यालयात अंडर सेक्रेटरी जनरल म्हणून काम केले आहे. त्यावेळी ते अनेक वर्ष अमेरिकेतच राहात होते. एखाद्या राष्ट्राच्या प्रमुखाने दुसऱ्या राष्ट्राला असे धमाकवणे यापूर्वी आपण कधीच ऐकले नव्हते हा खेदजनक प्रकार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.