– श्रीकांत कात्रे
माणदेशी फाउंडेशन आणि माणदेशी महिला सहकारी बॅंक या दोन्ही संस्थांनी महिलांमधील उद्योजकतेचा गुण हेरला आणि त्यांच्या उद्योग- व्यवसायाच्या भरभराटीसाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. सुवर्णा रसाळ यांच्या मूर्ती तयार करण्याच्या उद्योगालाही माणदेशीने दिलेले बळ महत्त्वाचे ठरले.
छत्रपती शिवाजी महाराज, गणपती, राधाकृष्ण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, साईबाबा आणि अशा कितीतरी जणांच्या मूर्ती पाहिल्यावरच आपल्याला मोठी प्रेरणा मिळते. अशा मूर्ती तयार करण्याचा परंपरागत व्यवसाय करण्याची उर्मी सुवर्णा किशोर रसाळ यांच्या मनात होती. ते काम त्यांनी शिकून घेतले आणि या व्यवसायात स्थिरता मिळवली.
माणदेशी संस्थांनी सुवर्णाताईंची ही धडपड हेरून त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांनी या व्यवसायात मोठी भरारी घेतली. कात्रज (पुणे) हेच त्यांचे माहेरही आणि सासरही. लग्नापूर्वी बारावी झाल्यानंतर त्यांनी नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी काही करावयाचे ही घरच्यांची इच्छा त्यांनी पूर्ण केली. लग्नानंतर सासरी आल्यावर मात्र त्यांना नोकरी करणे शक्य झाले नाही.
सासरी मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय पूर्वी होता. परंतु, त्यांचे पती व दीर यांनी तो परंपरागत व्यवसाय न करता उपजिविकेसाठी इतर साधन अवलंबिले. मुलगा मोठा झाल्यावर घरी काही तरी केले पाहिजे, हा विचार त्यांना स्वस्थ बसून देत नव्हता. अखेर त्यांनी मूर्ती तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय करण्याचे निश्चित केले. पतींकडून या कामाचे बारकाव्यांसह प्रशिक्षण घेतले.
सुमारे 2010 च्या दरम्यान व्यवसाय सुरू केला. सुरवातीच्या काळात अनेक अडचणी समोर येत होत्या. पण त्यावर मात करीत हळूहळू व्यवसायाने उभारी धरली. 2016- 17 च्या दरम्यान माणदेशीशी त्यांचा संपर्क आला आणि पूर्ण व्यवसायाची दिशाच बदलून गेली, असे त्या सांगतात. काम सुरू केले एकटीने.
आता त्यांच्या मदतीला तीन कारागिर आहेत. विविध प्रकारच्या मूर्ती किंवा फ्रेमस तयार करण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले हे पाहून माणदेशीने या व्यवसायाला मोठे स्वरूप देण्यासाठी त्यांना मदत करणे सुरू केले. रंगकामासाठी आवश्यक मशीन त्या सहकार्यातून मिळाले. विविध साच्याचे सेटस तयार करण्यासाठी माणदेशीने त्यांना सुचविले. पूर्वी थोडेसे होलसेल आणि किरकोळ मार्केटिग होते.
साच्याचा सेटअप करण्यासह मार्केटिंगचे तंत्र माणदेशीने शिकवले. त्याशिवाय डीजिटल ट्रेनिंगमुळे सर्व व्यवहार ऑनलाइन होऊ लागले. व्यवसायाचा हिशोब करण्यासाठी याच तंत्राचा उपयोग होत आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस, साचे आणि रबर यांचा उपयोग करून सर्व प्रकारचे अधिक उत्पादन घेणे शक्य होऊ लागले. मागणीनुसार उत्पादन होऊ लागले. राधाकृष्ण, गणपती अशा काही मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणावर असते.
अशा मूर्तींचे अनेक प्रकार तयार करूनच ठेवलेल्या असतात. गेल्या काही वर्षांत चौघडा नावाची एक वेगळी फ्रेम तयार केली. त्या फ्रेममध्ये विठ्ठल- रुक्मिणी, ज्ञानदेव व तुकाराम यांच्या मूर्ती आहेत. हे काम प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये केले आहे. या लॉकडाऊनच्या काळात धाडसाने एक वेगळा प्रयोग त्यांनी केला. रायगडावरील मेघडंबरी आणि शिवाजी महाराज. हे तयार करणे खूप जोखमीचे काम होते. आता यालाही मागणी मोठी आहे.
राधाकृष्ण, गणपती, डॉ. बाबासाहेब आंबडेकर, गौतम बुद्ध, साईबाबा अशा 9 ते 10 सेंटिमीटर आकाराच्या विविध प्रकारच्या मूर्तींना प्रचंड मागणी असते. काही 3 ते 18 इंच आकाराच्या मूर्तींही तयार केल्या जातात. या सर्व मूर्तीसाठी विविध नऊ प्रकारचे रंग उपयोगात आणले जातात. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे त्यांना हव्या त्या रंगाची मूर्ती तयार करून देता येते.
या कामासाठी लागणारा सर्व कच्चा माल पुण्यातच उपलब्ध होतो. हे सर्व उभे करताना अडचणी तर खूप आल्या, संघर्ष तर असतोच. पण जिद्दीने आणि कष्टाने सुवर्णाताईंनी हे काम उभे केले. माणदेशीने दिलेल्या प्रोत्साहनामुळे ते वाढविले. मुख्य अडचण असते ती वाहतुकीची. पूर्वी माल दिल्यानंतर काही वेळा पैसे मिळाले नाहीत, असेही प्रकार घडले.
त्यामुळे आता ऑर्डर घेतानाच आधी ऑनलाइन पेमेंट आणि मग पुरवठा असे धोरण अवलंबिले आहे. पुण्यामुंबईसह नाशिक, औरंगाबाद, सांगली अशी महाराष्ट्रभर सगळीकडे या उत्पादनाची विक्री होते. केरळसारख्या परराज्यातही या मूर्ती गेल्या आहेत. आता इथे थांबायचे नाही, राज्यासह परराज्यांतच नव्हे तर भारताबाहेरही हे उत्पादन गेले पाहिजे, असे ठरविले आहे.
त्यासाठी माणदेशीचा आवश्यक पाठिंबाही मिळणार आहे. विविध मूर्ती बनविण्याचा आनंदही वेगळाच मिळतो आणि या वेगळ्या व्यवसायातून आर्थिक हातभारही मिळतो. त्यामुळे माणदेशीने माझ्या मनातील इच्छापूर्तीलाच ताकद दिली आहे, असे त्या सांगत होत्या.