मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आपल्या खास ‘पवारी’ शैलीमध्ये निशाणा साधला. ‘नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर बोलणार नाही’ असं म्हणत पवार यांनी पटोले यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.
दरम्यान, पवार यांनी नाना पटोलेंना ‘लहान माणूस’ असं सोबोधल्यामुळे भाजप नेते आता पटोले यांना चिमटा काढताना दिसतायेत. याबाबत ट्विट करताना भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी, “नानाजी केवढा अपमान तुमचा? तुम्ही प्रतिक्रिया देण्यालायक दखलपात्र पण नाहीत अस तुमच सहकारी पक्ष म्हणतोय.’ पटोले यांना असा टोला लगावला आहे.
@NANA_PATOLE नानाजी केवढा अपमान तुमचा? तुम्ही प्रतिक्रिया देण्यालायक दखलपात्र पण नाहीत अस तुमच सहकारी पक्ष म्हणतोय. @PawarSpeaks म्हणत आहेत. pic.twitter.com/QNqYTcoLs9
— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 11, 2021
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार हे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांनी एकत्र येत स्थापन केलं. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये नेहमीच काँग्रेस पक्षाकडून नाराजी बाहेर येतांना दिसते. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देत लोणावळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. यावरूनच आता भाजप नेत्यांनी नाना पटोले यांना चिमटा काढला आहे.