भारत-श्रीलंका मालिका 18 जुलैपासून

नवी दिल्ली/कोलंबो – भारत-श्रीलंका यांच्या दरम्यान 13 जुलैरपसून सुरू होणारी मालिका 18 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यजमान श्रीलंका संघातील व्यक्ती बाधित होण्याची मालिका आजही कायम राहिली. श्रीलंका संघ व्यवस्थापनातील आणखी एक व्यक्ती आज बाधित आढळून आली. त्यामुळे मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

इंग्लंड दौऱ्याहून परतलेल्या श्रीलंका संघातील दोन व्यक्ती कोरोनाच्या संसर्गाने बाधित आढळल्या आहेत. यात फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅंट फ्लॉवर आणि संघाचे विश्लेषक जी टी निरोशान यांचा समावेश आहे. या मध्ये आज फलंदाज संदुन वीराकोडी याची भर पडली.

विशेष म्हणजे विराकोडी हा इंग्लंड दौऱ्यासाठी गेलेला नव्हता. श्रीलंकेचा पूर्ण संघ सध्या विलगीकरणात असून, सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टिने श्रीलंका मंडळाने या संघाचा विलगीकरणाचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

आता 13 जुलै रोजी होणारा पहिला सामना 18 जुलैस होईल. दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 20 आणि 23 जुलैस खेळविण्यात येईल.मालिकेतील तीन टी 20 सामने 21, 23 आणि 25 जुलैस होणार होते. आता ते 25, 27 आणि 29 जुलैस होतील.

याव्यतिरिक्त श्रीलंकेच्या संघात करोनाचे आगमन झाल्यानंतर बीसीसीआयने श्रीलंकेच्या बोर्डाकडे संघाचे हॉटेल बदलण्याची मागणी केली होती. बीसीसीआयची मागणी मान्य करीत श्रीलंका बोर्डाने आपल्या खेळाडूंना हॉटेल समुद्रामधून ग्रँड सिनामन हॉटेलमध्ये हलवले आहे.

भारतीय खेळाडू देखील हॉटेल समुद्रात मुक्काम करत आहेत. हा दौरा रद्द झाल्यास श्रीलंका क्रिकेट बोर्डाला सुमारे 90 कोटींचे नुकसान सहन करावे लागेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.