पिंपरी – यांत्रिकी पद्धतीने शहरातील रस्ते, मंडई व इतर मोकळ्या जागांची साफसफाई करण्याचा वादग्रस्त ठरलेला प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर पुन्हा मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या कामाच्या आरएफपी मसुद्यात बदल करून सुधारित आरएफपी मसुदा करण्यात आला आहे. या कामाची 7 वर्ष कालावधीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी होणाऱ्या 362 कोटी रुपयांच्या अथवा प्रत्यक्ष खर्चास प्रशासकीय मान्यता घेतली जाणार आहे.
यांत्रिकीकरणाद्वारे साफसफाईचा विषय प्रशासकीय मान्यतेसाठी ठेवण्यासाठी महापालिकेच्या यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच, जुन्या आरएपीमधील 4 पॅकेजऐवजी 2 पॅकेजमध्ये शहरातील रस्त्यांची विभागणी करून सुधारित आरएपी मसुदा तयार केला आहे.
खर्चामध्ये कपात करून यंत्रे आणि मनुष्यबळाची फेररचना करण्यात यावी, असेही ठरावात नमूद केले आहे. आरएफपीमध्ये असलेली रचना व खर्च यामध्ये बदल झालेला आहे. या कामासाठी टंडन अर्बनन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत सुधारित आरएफपी मसुदा तयार केला आहे. त्यानुसार शहरातील 18 मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यांची दोन भागांमध्ये विभागणी केली आहे. त्याचे दोन पॅकेज तयार केले आहे.
पॅकेज क्रमांक एकसाठी 331 किलोमीटर आणि पॅकेज क्रमांक दोनसाठी 339.15 किलोमीटर इतकी रस्त्याची लांबी निश्चित केलेली आहे. त्यामुळे शहरातील एकत्रित रस्त्याची अंदाजित लांबी 670.15 किलोमीटर गृहीत धरण्यात आलेली आहे. त्यामध्ये शहरातील महामार्ग, बीआरटी मार्ग व 18 मीटर रस्त्यांची लांबी गृहीत धरली आहे. यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाई कामकाजासाठी आवश्यक असलेल्या वाहनांची व मनुष्यबळाबाबतची माहिती आरएफपीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या कामाचा निविदा कालावधी 7 वर्षांचा आहे. त्यासाठी 362.04 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मंजुरी आवश्यक
निविदा कालावधी सात वर्षांचा असल्याने त्यासाठी महापालिका सभेची प्रशासकीय मान्यता घेणे महापालिका कायद्यानुसार आवश्यक आहे. सभेची प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर आरएफपी मसुद्यामध्ये निविदा प्रक्रियेपूर्वी अथवा निविदा प्रक्रियेदरम्यान काही बदल करणे आवश्यक असल्यास हे बदल करण्याचे अधिकार आयुक्तांना राहतील. मनुष्यबळ, वाहनसंख्या, अंदाजित/प्रत्यक्ष खर्च आदींचा त्यामध्ये समावेश असणार आहे. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर निश्चित होणाऱ्या दराला स्थायी समिती सभेची मान्यता घ्यावी लागणार आहे.