पिंपरी -दिवाळीच्या सलग सुट्ट्या आणि जोडून आलेल्या साप्ताहिक सुट्ट्या यामुळे महापालिका भवनात सोमवारी (दि. 8) दिवाळी सुट्टीचा “मूड’ पाहण्यास मिळाला. परगावी व पर्यटनस्थळांवर फिरायला जाण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सुट्ट्यांना जोडून सुट्ट्या घेतल्या असल्याने सोमवारी महापालिका भवनात दिवसभर शुकशुकाट पाहण्यास मिळाला.
महापालिकेला मंगळवारी (दि. 2) धनत्रयोदशीची सुट्टी होती. त्यानंतर बुधवारी महापालिका सुरू होती. तर, पुन्हा गुरुवारी (दि. 4) लक्ष्मीपूजन, शुक्रवारी (दि. 5) दिवाळी पाडव्याची सुट्टी होती. त्यानंतर शनिवार आणि रविवार साप्ताहिक सुट्टी होती. या सुट्ट्यांना जोडूनच बऱ्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी देखील सुट्टी घेतल्याने आज महापालिका भवनात शुकशुकाट होता. अधिकारी व कर्मचारी कमी संख्येने उपस्थित असल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांना माघारी परतावे लागले.
महापालिकेतील बांधकाम परवानगी विभागात विविध कंत्राटदार, विकसक तसेच नागरिकांचा कामासाठी राबता असतो. मात्र, येथे आज शुकशुकाट पाहण्यास मिळाला. हीच परिस्थिती नगररचना, वैद्यकीय, आरोग्य, शिक्षण आदी विभागांमध्ये देखील पाहण्यास मिळाली. त्याशिवाय, महापालिकेतील काही प्रमुख पदाधिकारी देखील आज अनुपस्थित होते.