इयत्ता नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

परीक्षा, मूल्यमापनाबाबत शासन निर्णयाची प्रतीक्षा

पुणे – पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उर्त्तीण केले जाणार आहे. पण, इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा व वार्षिक मूल्यमापनाबाबत शासनाने अजूनही काहीच मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या नाहीत. त्यामुळे शासन काय निर्णय घेणार याकडे शिक्षक, विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा एप्रिल-मेमध्ये ऑफलाइन होणार आहेत. मात्र, आता करोनाच्या आणखी वाढलेल्या संकटामुळे या परीक्षांबाबतच्या निर्णयात शासन काही बदल करणार का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

नववीचे विद्यार्थी दहावीला आणि अकरावीचे विद्यार्थी बारावीला जाणार असल्याने त्यांच्यासाठी हा शैक्षणिक पाया महत्त्वाचा ठरणार आहे. मागील वर्षी अंतर्गत मूल्यमापनानुसार नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात आले होते. यंदा मात्र पूर्ण वर्षच ऑनलाइन शिक्षणात गेले आहे.

बहुसंख्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या चाचणी, सत्र या ऑनलाइन परीक्षा घेतल्या आहेत. काहींच्या परीक्षा आता सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे निकाल कसे लावायचे, असा प्रश्‍न शिक्षकांपुढे उभा राहिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.