“सरकारच्या हफ्ते वसुलीचे सत्य आता बाहेर येणार “; न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस आक्रमक

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेल्या गंभीर आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक चौकशी पूर्ण कऱण्यास सांगितलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय़ अनिल देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्णयावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“पोलिसांना वसुलीचं टार्गेट देऊन महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारा प्रकार या सरकारनं केला. प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न झाला. पण हायकोर्टानं सरकारला जोरदार चपराक लगावून याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. आता या प्रकरणातलं सत्य बाहेर येईल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

“राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप हे काही आता राज्यातील एका राजकीय पक्षाचे राहिलेले नाहीत. आता कोर्टानंच याप्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे नैतिकता बाळगून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना चौकशीला सामोरं जाण्याचे आदेश द्यावेत. ते याप्रकरणातून निर्दोष मुक्त झाले की त्यांना खुशाल पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं”, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

“हफ्ते वसुलीचं काम सरकारमधील मंत्र्यांच्या आशीर्वादाने होत होतं. सीबीआय चौकशी होऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात होते. रश्मी शुक्ला अहवाल, परमबीर सिंग यांचे पत्र कसं खोटं आहे हे भासवण्याचा प्रयत्न केला. पण हायकोर्टानं आज कडक भूमिका घेत सरकारला झटका दिला आहे. आता गृहमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. अनिल देशमुखांनी या पदावर राहणं योग्य नाही”, असे फडणवीस म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांनी या विषयात घेतलेली भूमिका पदाला शोभणारी नाही. आधी त्यांनी सचिन वाझेंची पाठराखण केली. कारवाई झाल्यानंतर त्यांनी एकही वक्तव्य केलं नाही. राज्यात इतक्या गंभीर घटना घडल्यानंतर एकही वक्तव्य न येणं हे आश्चर्यकारक आहे. अजूनपर्यंत राज्यात इतका गंभीर विषय झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांचं मौन आश्चर्यचकित करणारं आहे. आता तरी अपेक्षा आहे की, मुख्यमंत्र्यांनी पदाचा मान राखत आणि ज्या घराण्यातून ते येतात त्याचाही मान राखत यासंदर्भात कडक कारावई केली पाहिजे. अन्यथ लोक त्यांच्याकडेही संशयाच्या नजरेने पाहतील,” अशी टीका फडणवीसांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.