सातारा – सातारा शहरात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तरुणाईची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठेत भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड, तसेच गुलाबाच्या फुलांना मागणी वाढली असून हळुवार प्रेम संदेश देणाऱ्या शुभेच्छा पत्रांनी दुकाने सजली आहेत. मात्र, व्हॅलेंटाईन डे च्या नावाखाली होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी काही संघटना सक्रीय झाल्या असून अजिंक्यतारा, चारभिंती या ठिकाणी त्यांचा जोरदार पहारा असणार आहे.
विविध डे च्या पार्श्वभूमीवर यंदाचा व्हॅलेंटाईन डे करोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. वात्सल्य, ममत्व असे अनेक प्रेमाचे रंग सांगणारा व्हॅलेंटाईन डे मात्र, हा केवळ प्रियकर आणि प्रेयसी यांच्यातील स्नेहाचा अनमोल धागा शुभेच्छा पत्रांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. अशी शुभेच्छापत्रे पोवई नाका येथील व कमानी हौद येथील विविध आर्चीस गॅलरीमधून तरुणाईसाठी आकर्षण ठरली आहेत. साताऱ्यात चौफुला, यवत, दौंड, बारामती, उरुळी कांचन येथून मोठ्या प्रमाणावर गुलाबाच्या फुलांची आवक झाली असून व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी गुलाबाच्या फुलाची किंमत वीस रुपयापासून चाळीस रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
कोणाला प्रेमाची कबुली द्यायची असते तर कोणाला ब्रेकअप झाल्यामुळे वेगळे शुभेच्छापत्र द्यायचे असते. अशा प्रत्येक मजकुरांच्या शुभेच्छापत्रांनी बाजारपेठ सजली आहे. याशिवाय हॅन्ड बॅंड टेडीबेअर इत्यादी साधने प्रेम व्यक्त करण्यासाठी दुकानात विक्रीसाठी उपलब्ध असून त्यांच्या किमती अगदी दहा रुपयापासून शंभर रुपयापर्यंत आहेत. रेशमाच्या आकर्षक फ्रेंडशिप बॅंडने सुद्धा दुकाने सजली असून ऑनलाइन शॉपिंगमुळे भेटवस्तूंसाठीचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे बाजारातून विविध भेटवस्तू खरेदी करण्याचा वेळ वाचत आहे. शिवाय विविध ऑफर्समुळे ऑनलाइन शॉपिंगला तरुण वर्गाच्या अधिक पसंती आहे. या संधीचा फायदा घेत भेटवस्तूंच्या किमतीमध्ये 50 ते 60 टक्के सूट देण्यात आली आहे.