सातारा – वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेससह विविध पक्ष, संघटनांच्यावतीने करण्यात आली होती. ठिकठिकाणी आंदोलनेही झाली होती. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला. त्याबद्दल येथील पोवईनाक्यावर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आनंदोत्सव साजरा करुन पेढे वाटप करण्यात आले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी “राज्यपाल कोश्यारी बायबाय’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
राज्यपाल कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त विधाने केली होती. विविध पक्ष संघटनांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीनेही कोश्यारी यांचा जोरदार निषेध करण्यात आला होता. राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने करुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने राज्यपाल कोश्यारींबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यभरातून होणाऱ्या वाढत्या विरोधामुळे कोश्यारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला होता.
हा राजीनामा मंजूर झाल्याने पक्षाने पोवईनाका परिसरात आंनदोत्सव साजरा केला. यावेळी नागरिकांना पेढे वाटप करुन आकाशात फुगे सोडण्यात आले. यावेळी युवा नेते तेजस शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ नलवडे, महिला आघाडीच्या समिंद्रा जाधव, विद्यार्थी कॉंग्रेसचे अतुल शिंदे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रमेश उबाळे, शफीक शेख, मंगेश ढाणे, प्रतिक कदम, आतिष कदम, सागर पवार, विकास अवघडे, महेश जाधव, प्रथमेश पवार, आकाश जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.