दौंड बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर : भ्रष्ट अधिकाऱ्यांवर
वासुंदे- येथील रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या निधीत दर्जाला हरताळ फासला आहे, त्यामुळे दौंड बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या 10 लाख रुपयांच्या निधींचा चुराडा होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.
दौंड सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणारी कामे अनेक ठिकाणी सुरू आहेत. मात्र, या कामावर कोणतेच अधिकारी, शाखा अभियंता उपलब्ध नसतो, अशी नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे ठेकेदारांचे चांगलेच फावत आहे. सिमेंट कॉंक्रिटीकरणाच्या कामामध्ये हातमिळवणी करून सिमेंटचे प्रमाण कमी करीत आहेत, असा आरोप नागरिकांतून होत आहे. त्यामुळे दर्जेदार कामे होत नसून लवकरच ती कामे खराब होत आहेत. वासुंदे येथे 10 लाख रुपये किमतीचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम पूर्णपणे निकृष्ट व दर्जाहीन आहे. या कामांमध्ये खडीकरण करताना अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नसून अंदाजपत्रकापेक्षा कमी प्रमाणात खडीचे प्रमाण वापरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विकासकामांच्या निधीला अधिकारी हरताळ फासत आहेत.
कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार, अशी चर्चा स्थानिक लोकांमध्ये आहेत. निकृष्ट कामासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता उडवाउडवीची उत्तरे किंवा फोन न घेणे हेच पर्याय ते अवलंबत आहेत. वासुंदे येथील काम सुरू होऊन अर्धे काम संपत आले तरी अधिकारी उपलब्ध नाही. त्यामुळे जनतेने तक्रार कोणाकडे करायची, असा संतप्त सवाल ग्रामस्थांना पडत आहे. संबंधित काम हे मूळ ठेकेदाराकडून सब ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराकडे रस्ते बनवण्यासाठी लागणारी कोणतीही सामग्री उपलब्ध नाही. त्यामुळे मूळ ठेकेदारावर अधिकारी कारवाई करणार का, असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत.
- वासुंदे येथील काम चुकीच्या पद्धतीने झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. काम बंद करण्यात आले आहे. संबंधित कामाची पाहणी करून दुरुस्त करून घेण्यात येईल. सध्या निवडणुकीचे काम आहे. त्यामुळे कामाकडे दुर्लक्ष होत आहे.
– काशिनाथ कमते, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, दौंड