वाई, (प्रतिनिधी)- सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत वाई विधानसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक कुमार उदय यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील मध्यवर्ती निवडणूक कक्षास भेट देऊन आढावा घेतला.
निरीक्षक कुमार उदय यांनी उमेदवारनिहाय अदयापपर्यंत केलेल्या खर्चाची नोंद खर्च नियंत्रण पथकाने नियमानुसार घेतल्याबाबत तपासणी केली. पथकास आवश्यक साहित्य उपलब्ध असल्याची पाहणी केली. तसेच ‘एक खिडकी’ कक्षामधून निवडणूक प्रचार व इतर कार्यक्रमांसाठी देण्यात येणाऱ्या परवान्यांची माहिती भेट पथक, व्डिडीओ पथक यांना देऊन त्याप्रमाणे उमदेवारांच्या खर्चाच्या नोंदी घेण्याच्या सूचना खर्च नियंत्रण पथकास दिल्या.
या भेटीवेळी निरीक्षक कुमार उदय यांनी मतदारयाद्या व पोस्टल मतदान प्रक्रियेच्या कामाचे स्वरूप जाणून घेतले. आचारसंहिता व सि- व्हिजिल कक्षास भेट देऊन आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. सि- व्हिजिलमधून नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे निराकरण विहित मुदतीत होत असल्याची खात्री केली व सर्व प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तत्पर असण्यावर भर दिला.
नियंत्रण कक्षातील संपर्क सुविधा कार्यरत असल्याची खात्री त्यांनी केली. निवडणूक कालावधीमध्ये संपर्क सुविधा यंत्रणा महत्त्वाची असल्याने नियंत्रण कक्षाने व नोडल अधिकारी यांनी याबाबतीत तत्पर राहावे, शी सूचना त्यांनी केली. तसेच लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे व प्रक्रियांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या.
खर्च निरिक्षक कुमार उदय यांनी वाई विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव तसेच अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वाई तहसीलदार, महाबळेश्वरचे तहसीलदारव खंडाळ्याच्या तहसीलदारांनी केलेल्या निवडणूक कामाच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.