सातारा, (प्रतिनिधी)- तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांत ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून वाढत्या उष्णतेचा कुकुटपालनावर परिणाम होत आहे. कोंबड्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून या प्रकारामुळे व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अनेक व्यावसायिक एप्रिल व मे महिन्यात कोंबड्यांचे पालन करण्यास धजावत नाहीत. उष्णतेच्या लाटेत कुकुटपालनातून मालाचे उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेत चिकनचे दरही तेजीत झाल्याचे पाहावयास मिळते.
उन्हाळ्यात पक्ष्याची मरतुक जास्त असल्याने आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे अनेक जण उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत कंपनीकडून पक्षी घेण्यास उत्सुक नसतात. काही शेतकरी उपाययोजना करुन पक्षी घेतात. मात्र, त्यांना कंपनीकडून अनेक नियम व अटी घालून देतात. त्यामुळे पशुपालक पुरता बेजार होत असल्याचे कुकुटपालक व्यावसायिकांचे म्हणणे आहे. वाढत्या उष्णतेमुळे कुकुटपालन व्यवसायावर परिणाम झाल्याने चिकनचे उत्पादन कमी झाले आहे.
सध्या यात्रांचा हंगाम असल्याने अनेकांची चिकनाला पसंती आहे. या दोन्ही कारणांमुळे चिकनचे दर वाढले आहेत. तसेच अंड्यांच्याही दरात वाढ झाली आहे. पक्ष्यांच्या मरतुकीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक जण उपाययोजना करतात. मात्र, यंदा उष्णतेची लाट एवढी मोठी आहे की पोल्ट्रीच्या शेडमध्ये दहा मिनिटे थांबल्यास घामाघुम होत आहे.
यावर काही व्यावसायिकांनी पत्र्यांवर झाळ्या, पाचट टाकून त्यावर पाण्याचे स्प्रिंकलर बसविण्यात आले आहेत. जेणेकरुन पोल्ट्रीत काही प्रमाणात गारवा निर्माण होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उन्हाळ्याच्या तीन ते चार महिन्यांत पक्ष्यांचे मरतुकीचे प्रमाण वाढते. ज्या पोल्ट्रीत तीन हजार पक्षी आहेत तेथे उन्हाळ्यात सरासरी चारशे ते पाचशे पक्षांचा मृत्यू होत आहे.
ज्या ठिकाणी पाच हजार पक्ष्यांचे शेड आहे तेथे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. काही व्यावसायिक उपायोजना करुन मरतुकीचे प्रमाण कमी करत आहेत. अनेकदा वातावरणात थंडावा राहण्यासाठी आम्ही उपाययोजना करतो. मात्र, ४० अंश सेल्सिअस तापमानात या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. जून महिन्यात उष्णता कमी झाल्यानंतर मरतुकीचे प्रमाण कमी होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
उन्हाळ्यात अशी घ्यावी काळजी
– शेडमध्ये थंड हवेसाठी मोठे पंखे लावावेत
– मुबलक प्रमाणात शुद्ध व थंड पाणी पुरवावे
– छताच्या पत्र्यावर पालापाचोळा टाकून तुषार सिंचन बसवावे
– लसीकरण दुपारी न करता पहाटे किंवा रात्री करावे.
– शेडवर सिमेंटचे पत्रे असावेत