जवळार्जून- रोमनवाडी (ता. पुरंदर) मुक्कामी असणारी एसटी बस गेल्या वीस दिवसांपासून बंद केल्यामुळे जेजुरी, सासवड या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
संध्याकाळी सात वाजता जेजुरीतून रोमनवाडी येथे एसटी मुक्कामी येते आणि सकाळी साडेसहा वाजता पुणे या ठिकाणी जात असते.
अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी बसने सकाळी प्रवास करतात. परंतु, मागील वीस दिवसांपासून सासवड एसटी डेपोने ही बस बंद केली आहे. सध्या परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिवसभर एसटीची वाट बघत बसणे किंवा इतर वाहनांने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जावे लागत आहे. अनेक वेळा खासगी वाहन वेळेवर न मिळल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.