कोरेगाव (प्रतिनिधी)- ‘मी मतदान करणार आणि इतरांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करणार,‘ असा निर्धार कोरेगाव विधानसभा मतदारसंघांतर्गत साप या गावात दिव्यांग बांधवांनी व्यक्त केला.
मतदान जनजागृती पथकातर्फे सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. स्पर्धा, व्याख्याने, मेळावे आदींच्या माध्यमातून मतदानाचे आणि लोकशाहीचे महत्त्व नागरिकांच्या मनावर ठसविण्यात येत आहे. त्याअंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाला दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि जागृती करणाऱ्या अधिकार्यांबरोबर मुक्त संवाद साधला.
मतदान जनजागृती पथकाचे प्रमुख यशेंद्र क्षीरसागर, सदस्य मंगेश घाडगे, ग्रामसेवक किरण कंठे तसेच राहुल कदम आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मतदानाची शपथ घेण्यात आली. शंभर टक्के मतदान होणे ही आदर्श अवस्था आहे.
भारतासारख्या देशात केवळ ६० टक्के किंवा ५५ टक्के मतदान होणे ही गोष्ट निश्चितच योग्य नाही. काही ठिकाणी तर ५० टक्के पेक्षा कमी मतदान होत आहे. ही गोष्ट एवढ्या मोठ्या लोकशाही देशात योग्य नाही .त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होणे आवश्यक आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.