ठाणे – ठाणे शहरात करोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंगळवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आध्यादेश काढत संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार 2 जुलैच्या सकाळी 7 ते 12 जुलै सकाळी 7 वाजेर्पयत संपूर्ण ठाणो शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शहरातील सर्व हॉटस्पॉटमध्ये कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या कालावधीत शहरात केवळ मेडीकल, डॉक्टरांचे दवाखाने आणि दुध विक्रीचीच दुकाने सुरू राहणार असून उर्वरीत सर्वच व्यवहार बंद राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
शहरात 8 हजाराहून अधिक करोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. तर 290 हून नागरिकांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे. अनलॉक जाहीर झाल्यापासून शहरात करोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार हे निश्चित मानले जात होते.
परंतु रुग्ण शोधून ते भाग हॉटस्पॉट म्हणून घोषीत करुन त्या भागांमध्येच बंद करण्याची चर्चा मागील दोन दिवस सुरू होती. त्यानुसार आध्यादेशही काढण्यात आला होता. परंतु अचानक रात्री उशिरा मंगळवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आयुक्तांना दिलेल्या अधिकारात नवा आध्यादेश काढून संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.