अर्ध्या दिवसाची रजा : बड्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेटलतीफ अधिकाऱ्यांना आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. माहिती व तंत्रज्ञाविभागामार्फत आयोजित केलेल्या बैठकीला उशीरा आलेल्या आठ अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच त्यांची अर्ध्या दिवसाची किरकोळ रजा खर्ची टाकली आहे.
दोन सहाय्यक आयुक्त, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, मुख्य उद्यान अधिक्षक, कार्यकारी अभियंता, मुख्य अग्निशामक अधिकारी, प्राचार्यांसारख्या बड्या अधिकाऱ्यांनाही आयुक्तांनी कारवाईचा बडगा दाखवला आहे. सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे, मोरवाडीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सुसज्ज जीवनमानाबाबत 15 जून 2016 रोजी सकाळी 11 ते 1 यावेळेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. ही महत्वाची बैठक असल्याने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत उपस्थित राहण्याबाबत सूचना केल्या होत्या, तरी हे अधिकारी नियोजित बैठकीला वेळेवर आले नाहीत.